उपवास : शास्त्र की विज्ञान

आपल्यापैकी बरेच जण श्रावणात उपवास धरतात.अर्थात आपल्याकडचे उपवास हे बर्‍याचदा श्रद्धेपोटी किंवा शास्त्र म्हणून केले जातात. पण उपवासामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घेण्याच प्रयत्न कोणीही करत नाही.असो, या लेखातून आपण उपवास आणि त्याचे फायदे तोटे याबद्दल विश्लेषण करून त्यामागचे विज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

श्रावणात उपवास करावे का ?

उपवास करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही, बदलत्या ऋतूनुसार आहार बदलणे आवश्यक असते. पावसाळ्यात वातावरणात आद्रता असल्याने आपली पचनशक्ती कमकुवत होते आणि जीवणूजन्य रोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शकतो या काळात पचायला हलका आणि व्यवस्थित शिजवलेला आणि मध्यम आहार घेणे फायद्याचे असते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पावसाळा पूर्ण चार महिने असतो तर मग उपवास श्रावणातचं का करतात? पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीतील बहुतेक सण श्रावणानंतर सुरू होतात. सणादरम्यान बहुतेक घरांमध्ये गोड, कर्बोदके युक्त (कार्बोहायड्रेट्स), तूप अथवा तेलात तळलेले, उच्च उष्मांकयुक्त (उच्च कॅलरी) पदार्थ बनवले जातात. सणांदरम्यान भावनिक आहार सेवन या मानसिक प्रकृतीमुळे कळत नकळत गरजेपेक्षा जास्त उच्च उष्मांकयुक्त पदार्थ सेवन केले जातात आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे श्रावण महिन्यात आहारावर आणि उच्च उष्मांक पदार्थ सेवनावर थोडा संयम ठेवल्यास आयोग्याचा सुवर्णमध्य राखला जातो. परंतु बर्‍याचदा श्रावणानंतर आहार पद्धतीत मोठे बदल होत असल्याने, श्रावणातील उपवासाचा तितकासा फायदा शरीराला होत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला गेल्यास काही दिवस उपवास करून नंतर पुरेमाप खाण्यापेक्षा, संपूर्ण वर्षभर योग्य, मोजके आणि आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे जास्त परिणामकारक आहे.

उपवास केल्याचे फायदे 

  • इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीत वाढ 
    उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीत वाढ होऊ शकते. सायन्स डायरेक्ट या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार उपवास केल्याने इन्शुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी पेशींना संकेत देतात. अर्थात इन्सुलिनची परिणामकता वाढून पेशींद्वारे रक्तशर्करा (ब्लड ग्लुकोज) स्वीकारण्याची प्रकृती वाढते आणि त्यायोगे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
  •  वजन कमी होऊ शकते
    अधूनमधून उपवास केल्याने कमी उष्मांक शरीरात जमा होतात आणि चयापचय क्रिया काही अंशी वाढते. उपवासदरम्यान शरीरातील रक्तशर्करा आणि ग्लायकोजेन दैनंदिन कामासाठी वापरले जाऊन, त्यानंतर ऊर्जेसाठी शरीरात साठवलेले मेद, अर्थात फॅट वापरले जाण्याची शक्यता वाढते. परंतु काही वेळा दीर्घकाळ उपवास केल्याने हायपोग्लाइसीमिया, निर्जलीकरणाच्या समस्या उद्भवू शकतात.
  • चयापचयाची क्रिया सुधारते
    उपवास केल्याने आतड्यांना जरा आराम मिळतो. त्यामुळे शरीराला उष्मांक घटवण्याची संधी मिळते. उपवसांनातर भूक लागण्याची प्रवृत्ती सुधारते आणि भुकेशी निगडित शरीरातील संप्ररके उत्तमरित्या काम करू लागतात.
  • मेंदूचे आरोग्य सुधारते
    उपवास केल्याने ऑक्सिडेटीटिव्ह ताण कमी होऊन, मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते उंदीर आणि उंदीरांवरील अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की अधूनमधून उपवास केल्याने नवीन मज्जातंतू पेशींची वाढ वाढू शकते, ज्याचा मेंदूच्या आरोग्यासाठी फायदा होतो. त्याचसोबत ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर नावाच्या प्रोटिनची मेंदूत निर्मिती होऊ, मेंदूचे आरोग्य सुधारते.
  • प्रतिकारशक्तीमध्ये सुधारणा होते
    कर्करोगाच्या पेशींचे नियंत्रण करणे, फ्रि रॅडिकल मुळे होणारे नुकसान  कमी करणे, शरीरातील दाह नियंत्रित करणे इत्यादी गोष्टी उपवासाच्या माध्यमातून साध्य होऊ शकतात.

उपवास केल्याचे तोटे

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, अगदी त्याचप्रमाणे उपवास केल्याचे काही तोटे देखील आहेत. यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) नुसार, अधूनमधून उपवास करण्याशी संबंधित असंख्य आरोग्य धोके आहेत.उपवासदरम्यान एखाद्यास डिहायड्रेशन होऊ शकते, कारण त्यांच्या शरीराला अन्नातून द्रव मिळत नाही.त्यामुळे उपवास करणार्‍या व्यक्तींनी उपवासाच्या काळात योग्यरित्या पाणी अथवा सरबताचे सेवन करावे. जर तुम्हाला वेळेत आणि पुरेसे खाण्याची सवय सवय असेल तर उपवास कालावधी हे एक मोठे आव्हान असू शकते. अशाप्रकारे, उपवास केल्याने तुमची तणाव पातळी वाढवू शकते आणि झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. डिहायड्रेशन, उपासमार किंवा उपवासाच्या काळात झोपेची कमतरता किंवा डोकेदुखी देखील होऊ शकते. उपवासामुळे छातीत जळजळही होऊ शकते. शक्यतो, अन्नाअभावी पोटातील आम्ल कमी होते, जे अन्न पचवते आणि जीवाणू नष्ट करते. परंतु उपवासाच्या काळात अन्नाचा वास घेणे किंवा त्याबद्दल विचार करणे हे मेंदूला पोटात अधिक आम्ल निर्माण करण्यास सांगण्यास उत्तेजन देऊ शकते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.त्यामुळे उपवास करताना वरील सर्व बाबींचा, तसेच शारीरिक समस्यांचा विचार करणे देखील गरजेचे आहे.
  • उपवास कोणी करू नये ?
    अर्थात याबाबाबत मतमतांतरे असू शकतील, परंतु वैज्ञानिक दुष्टीकोणातून विचार केल्यास, गर्भवती महिला, मधुमेह रुग्ण, मूत्रपिंडाच्या तसेच हृदय विकाराच्या आजाराने त्रासलेले रुग्ण, आजारी व्यक्ती, लहान मुले तसेच वृद्ध या सर्वांनी उपवास करणे टाळावे. तसे केल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
  • उपवासदरम्यान काय खावे ? 
    हा सर्वात महत्वाचा आणि शेवटचा विषय. उपवासदरम्यान दुप्पट खाणार्‍यांची संख्या आपल्याकडे कमी नाही, त्यामुळे उपवासदरम्यान काय खावे हे समजून घेणे सगळ्यात गरजेचे आहे. उपवासादरम्यान तळलेले आणि तुपकट पदार्थ खाऊ नये. शक्यतो पचायला हलके, भाजलेले (शेंगदाणे, बटाटा) किंवा उकडलेले पदार्थ (कंदमुळे, रताळी) खावे. उपवासदरम्यान रक्तशर्करा अचानक कमी होऊ नये म्हणून एखादे फळ खावे अथवा साबुदाण्याचे पदार्थ खावे. साबुदाण्यातील शर्करा शरीरात हळूहळू शोषली जात असल्याने दिवसभर ऊर्जा मिळायला मदत होऊ शकते आणि रक्तशर्करेचे अचानक कमी होणे टाळले जाऊ शकते. याशिवाय शरीरातील पाण्याचे संतुलित प्रमाण राखणे देखील गरजेचे असल्याने, पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. 

-आहारातज्ञ कानन घरत , आहार सल्लागार दिनराज आपोणकर  (Healthy by food)

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट