|| श्री | महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठं
श्री तुळजाभवानी माता,तुळजापूर
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके|
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते||
या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:||
समस्त देवी भक्तांनो,आज गुरूवारपासून शारदीय नवरात्रारंभास सुरूवात होत आहे.आजपासून आपल्या श्रद्धाभक्तीच्या नवरात्र पर्वास प्रारंभ झाला आहे.नवरात्रीचे हे दिवस आपल्यासाठी अतिशय चैतन्यपूर्ण असतात.नितांत भक्तीभावाने आपण देवीची पूजा करतो,तिची मनधरणी करतो.
तिचा आशिर्वाद पुढे वर्षभर सुखदु:खात आपल्या पाठिशी असतो.आपल्या सर्वांच्या घरी कुलदैवत तुळजाभवानी म्हणून देवी विराजमान असते.महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी माता आहे.साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रथम शक्तीपीठ.भारतीय संस्कृतीत या देवीच्या रूपाला अनन्यसाधारण स्थान आहे. आपल्या संपूर्ण देशभरात या देवीरूपाची १०८ शक्तीपीठं आहेत,ही शक्तीपीठं हे त्याचंच द्योतक आहेत.यातील साडेतीन शक्तीपीठं ही आपल्या महाराष्ट्रात असून या साडेतीन शक्तीपीठां विषयी आ्पण जाणून घेऊयात...
तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची करनिवासिनी महालक्ष्मी,माहूरची रेणूकादेवी ही तीन शक्तीपीठं आणि नाशिकची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ,अशी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं आहेत.या साडेतीन शक्तीपीठांपैकी उस्मानाबाद जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणा-या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणा-या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी मातेचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी भवानी देवीचे दर्शन घेत असत.त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात तुळजाभवानी आईने तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते. श्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे.समुद्रसपाटीपासून २७० फूट उंचावर असलेल्या तालुक्याचे,उस्मानाबादपासून १८ किलोमीटर तर सोलापूर पासून ४४ किलो मीटरवर आहे.पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता.या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.
श्रीक्षेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्तीपीठ !
या देवीला तुर्जा- तुळजा (भवानी)असेही म्हटले जाते.या देवीचे जे भक्त तिचा धावा करतात,त्यांची इच्छा देवी पूर्ण करते.वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूर च्या दिशेने येत असतो.येणा-या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व परिसर अशा काही ठराविक गोष्टीच माहित असतात.परंतु या पलिकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा परंपरा जपलेल्या आहेत की,त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.साडेतीन शक्तीपीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढ्याच सहजपणे पुन्हा जागेवर बसविता येते.यामुळे वर्षातून तीनवेळा म्हणजे भाद्रपद वद्यअष्टमी,अश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते.ज्याला देवीचा निद्राकाल असे म्हटले जाते.घोरनिद्रा,श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढाच परंपरेने जोपासला जातो.अन्य कुठल्याही देवाला याप्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही.श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ ,सकाळ व सायंकाळी महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात,त्यावेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळा आणे कदम पुजारी या घरातील स्त्री- पुरूषांनाच असून आजही ती परंपरा कायम आहे. यांच्या व्यतिरिक्त कुणीही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही भगताकडून सांगितलेल्या माहितीनुसार तुळजापूरची मूळ मूर्ती ही शालीवाहन कालखंडातील आहे.
मंदिराच्या बांंधकामाची रचना ही हेमाडपंथी असून श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत.एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुस-या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे.देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पाय-या आहेत.मंदिरात प्रवेश केल्यानंतर कल्लोळ तीर्थकुंड लागते.तिथून वळल्यानंतर समोरच निंबाळकर दरवाजा आहे.अग्रभागी देवीचे होमकुंड ,त्याच्या मागील बाजूस मंदिर आहे.होमकुंडाच्या पाठीमागे भवानीशंकर मंदिर आहे. शंकराच्यासमोर भवानीमातेची मूर्ती आहे.देवीच्या पश्चिमेला दगडी तटबंदी(किल्ल्यासारखी) आहे.मंदिराच्या पश्चिमेला तीन मठाधिपतींचे स्थान (मठ)आहे.या मठाधिपतींचा मंदिरातील दैनंदिन सेवांशी संबंध आहे.मंदिरात कल्लोळ तीर्थ कुंड,गोमुख तीर्थ कुंड,अंधारकु़ड आणि नागझरी असे पाण्याचे स्त्रोत आहेत. अंधारकुंडाला अमृतकुंड असेही संबोधले जाते.हे गोड पाणृयाचे स्त्रोत आहे. मंदिराचा परिसर अकराशे फुट रूंद आणि चारशे फुट अरूंद आहे.मंदिराच्या मुख्य गाभा-याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे.येथे श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते.तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे.अष्टभूजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत.आईच्या आठ हातात त्रिशूळ,बिचवा,बाण,चक्र,शंख,धणुष्य,पानपात्र,आणि राक्षसाची शेंडी आहे.पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुखाच्या उजव्या व डाव्या अंगाला सूर्य व चंद्र आहेत.तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो.दोन पायाच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे.देवीच्या उजव्या बाजूला मार्कंडेय ऋषी व सिंह आहे तर उजव्या बाजूस कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती दिसून येते.श्री तुळजाभवानीची मूर्ती चल मूर्ती आहे.येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्रीतुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून
एकूण तीनवेळा मूर्ती सिंहासनावरून हलवून गाभा-याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते.नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्यावेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते.देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र ,खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते.प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते.मंदिराच्या गाभा-यातच एका खांबावर चांदीचा कडा आहे.सात दिवस त्यास स्पर्श केल्याने जुनाट आजार बरे होतात,अशी भाविकांची श्रद्धा आहे.
महाराष्ट्रातील या देवतांना विशेष महत्व आहे आणि नवरात्रीचा उत्सवही जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरात ,हा उत्सव एकवीस दिवस चालतो.
श्रीमहालक्ष्मीमाता,कोल्हापूर
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे पूर्ण शक्तीपीठ म्हणजे श्रीमहालक्ष्मी. श्रीमहालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परिसरात पश्चिमाभिमुख असून या मंदिराचं भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण असे आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासोबत कर्नाटक, आंध्रप्रदेशातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात.जवळपास १३००वर्षे जुन्या आणि सर्वात प्राचीन असलेल्या या महालक्ष्मी मंदिरामध्ये दररोजच दिवाळी उत्सवाप्रमाणे वातावरण असते.त्यामुळे दरदिवशी अंदाजे ४०हजार भक्तांना हे मंदिर आकर्षित करीत असते. तिरूतीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीच्या दर्शनाशिवाय यात्रा पूर्ण होत नाही,अशी समस्त भाविकांची धारणा आहे. कोल्हापूरला प्राचीनकाळी गौरवाने "दक्षिणकाशी" असे म्हटले जाते.या मंदिराचा उल्लेख इ.स.च्या सुरूवातीपासून मिळतात.मंदिराच्या चारही दिशांना प्रवेशासाठी दरवाजे आहेत.इ.स.११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकिर्दित दक्षिण दरवाजा व येथील अतिबलेश्वर मंदिराचे काम पूर्ण झाले.
अंबाबाईची मृहणजेच येथील महालक्ष्मीची मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती तीन फूट उंच आहे.या मूर्तीचे वजन अंदाजे ४०किलो आहे.ही मूर्ती चतुर्भुजाही आहे.तिच्या हातांमध्ये मातृदिन,गदा,खेटक,पानपात्र या वस्तू आहेत.श्रीमहालक्ष्मी म्हणजे पार्वतीचे रूप आहे.देवीच्या वरच्या दोन हातांपैकी उजव्या हातात लांब गदा धारण केलेली असून डाव्या हातात पुढे केलेली ढाल आहे.खालच्या दोन हातांपैकी उजव्या हातावर म्हाळुंग असून डाव्या हातात पानपात्र(पाणी पिण्याचे भांडे) आहे.मस्तकावरील मुकुटावर देवीने शिवलिंग धारण केलेले आहे.मूर्तीच्या मागच्या बाजूला छत्रचामरे असून त्यावर चंद्र-सूर्य आहेत.मूर्तीच्या उजव्या बाजूला उत्सवमूर्ती ठेवलेली असते.देवी सिंहावर बसलेली आहे. महाराष्ट्रातील असंख्य स्त्रिया या अंबाबाईला सौभाग्याची देवता मानतात.दरवर्षी तिच्या दर्शनाला येणारी अनेक घराण्यातील मंडळी आहेत.पण ज्यांना हे जमत नाही त्या स्त्रिया आपापल्या घरी अंबाबाईच्या नावाने मंगळवारी, शुक्रवारी उपवास करतात.
प्राचीनकाळी केशी या राक्षसाचा मुलगा कोल्हासूर (आताचे कोल्हापूर)या भागावर राज्य करीत होता.कोल्हासूर नावाच्या दैत्यापाशी प्रचंड असूर सैन्य होते.तो करवीर नगरीच्या आसमंतातील ऋषि-मुनी आणि रहिवाशांना त्रास देऊ लागला. त्याने प्रजेवर प्रचंड अत्याचार चालवले होते आणि देवादिकांनाही हैराण करून टाकले होते.त्यामुळे आपले सौभाग्य नष्ट होण्याची भीती घराघरातील स्त्रीयांना वाटू लागली व त्यांनी पार्वती मातेकडे धाव घेतली.तिचे तप केले.पार्वती प्रसन्न झाली व तिने सर्व भक्त स्त्री-पुरूषांना अभयदान दिले. तिने महालक्ष्मीचे स्वरूप धारण केले व करवीर भागात येऊन कोल्हासूर व त्याच्या सैनिकांना नष्ट केले व नंतर ती विश्रांतीसाठी तेथे थांबली.
चिंतामुक्त झालेल्या ऋषी-मुनींनी आणि स्त्री -पुरूष जनतेने तिची महापूजा केली. तिच्यावर फुले उधळली.खण, साडी,नारळ यांनी तिची ओटी भरली आणि महालक्ष्मी तू आता आम्हाला सोडून जाऊ नकोस, इथेच वास्तव्य कर अशी प्रार्थना केली.महालक्ष्मीने त्यांची विनंती मान्य केली.कोल्हासूराच्या नावारूपाने पुढे या नगरीस कोल्हापूर हे नाव पडले.
महालक्ष्मी हे पार्वतीचे रूप आहे.तिचा पती काशीविश्वेश्वर काशीमध्ये असतो आणि त्याची ही पत्नी महालक्ष्मी करवीर क्षेत्री आहे पण पती-पत्नीचे नाते ते कुठेही असले तरी ते अतुट असते म्हणून तिचे भक्त करवीर नगरीला दक्षिणेची काशी म्हणू लागले. तिरूपतीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीच्या दर्शनाशिवाय यात्रा पूर्ण होत नाही,अशी भाविकांची धारणा आहे.तिरूपतीची रूसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापूरात आल्याची कथा सांगितली जाते.
प्रतिवर्षी कार्तिक मासात साधारणपणे ९,१० आणि ११ नोव्हेंबर असे तीन दिवस तसेच माघ मासात ३१जानेवारी,१आणि २फेब्रुवारी असे तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो. पहिल्या दिवशी सूर्यदेवाचे किरण देवीच्या चरणांना स्पर्श करतात. दुस-या दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मध्यभागावर येतात आणि तिस-या दिवशी ते देवीच्या मुखमंडलासह संपूर्ण मूर्तीला प्रकाशात न्हाऊन काढतात. किरणोत्सवाच्या प्रसंगी देवीची सालंकृत पूजा केलेली असते. सूर्यकिरणांनी मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी सर्व विद्युत दीप मालवून गाभा-यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. काही मिनिटांनंतर सूर्यकिरण गेल्यावर देवीची कर्पुरारती तसेच देवळात घंटानाद केला जातो.हा किरणोत्सवी सोहळा अतिशय मनोहारी असून हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्त कोल्हापूरला येतात.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापने पासूनचा नवरात्रौत्सव मोठा असतो.प्रतिदेला बैठीपूजा, व्दितीयेला खडीपूजा ,त्र्यंबोली पंचमीच्या दिवशी हत्तीच्या अंबारीतील रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा,अष्टमीला महिषासूरमर्दिनी ,सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजा साकार होतात.अष्टमीला घागरी फुंकण्या पद्धत आहे.मध्यरात्री पर्यंत धार्मिक सोहळे होतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन शस्त्रपूजा होते.तिरूपती मंदिरात आलेला शालू त्यादिवशी नेसविला जातो.दस-याच्यादिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते.संध्याकाळी तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते.दसरा चौकात सीमोल्लंघनाचा होणारा हा सोहळा संपन्न होतो.तिथे सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखी परत मंदिराकडे निघते व नवरात्रीचा सोहळा संपन्न होतो.
श्री रेणूकामाता,माहूर
माहूर येथील श्रीरेणूकामाता
हे साडेतीन शक्तीपीठांपैकी
हे तिसरे पूर्णपीठ
आहे.नांदेड जिल्ह्यातील
किनवट तालुक्यात माहूरगडासमोर
हे ठिकाण आहे.माहूर हे धार्मिक
शहर म्हणून प्रसिद्ध
तर आहेच त्याशिवाय
या शहराला इतिहासही
आहे. सातवाहन,क्षत्रप,गद्यान; औरंगजेब,निजाम,शिवाजी महाराज,पोर्तुगाल,ईस्ट इंडिया
कंपनी या तत्कालिन
राजवटींशी माहूरचा संबंध आलेला
आहे.येथील श्रीरेणूका
देवीचे मंदिर हे अतिशय
प्राचीन असून देवीचे
हे मंदिर १३व्या
शतकात देवगिरीच्या यादवकालिन
राजाने बांधले आहे तसेच
इ.स.१६२४
मध्ये शालिवाहन राजाने
त्याचा जिर्णोद्धार केल्याचे पुरावे
सापडतात.सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यास
वेढलेले जंगल अशा
निसर्गसमृद्धीतेने नटलेल्या वातावरणात समुद्रसमाटीपासून
एक हजार आठशे
फूट उंच असलेल्या
गडावर रेणूकामातेचा वास
आहे.
माहूरगडावर श्री दत्तात्रेयांचा
जन्म झाला असे
सांगितले जाते. अन्य शक्तीपीठात
देवीची पूर्ण मूर्ती आहे.परंतु माहूरला देवीचा
तांदळा का पूजला
जातो,यामागे एक
कथा सांगितली जाते.माता पार्वतीने
कुब्ज देशाच्या राजाच्या
पोटी जन्म घेतला.तिचे नाव
रेणू असे ठेवण्यात
आले.शंकराचा अवतार
मानलेल्या जमदग्नी बरोबर तिचे
लग्न झाले.जमदग्नी
ऋषींच्या आश्रमात अनेक शिष्य
शिकत असत.सर्वांच्या
मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू
गाय जमदग्नी ऋषींकडे
होती.राजा सहस्त्रार्जुनाला
या कामधेनूचा मोह
झाला.ऋषींकडून त्याने कामधेनू मागितली
परंतु ऋषींनी ती
दिली नाही.जमदग्नी
पुत्र आश्रमात नाही
ही संधी साधून
राजा सहस्त्रार्जुनाने आश्रमावर
हल्ला केला आणि
जमदग्नी ऋषींना ठार करून
कामधेनू हिरावून नेली.परशुराम
आल्यावर त्यांना घडलेला
सर्व प्रकार कळला.पित्याला अग्नी देण्यासाठी
कोरी भूमी हवी
म्हणून तृयाने
कावडीच्या एका पारड्यात
जमदगृनीचे पार्थिव व दुस-या पारड्यात
माता रेणूकाला बसवले.रानावनातून भटकत तो
माहूरगडावर आला.तिथे
वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला
कोरीभूमी दाखवली.
परशुरामाने तिथे पिता
जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले.त्यावेळी
रेणूकामाता सती गेली.या सर्व
विधीचे पौराहित्य दत्तात्रेयांनी केले.त्यानंतर परशुरामाला रेणूकामातेची
खूप आठवण येऊ
लागली.तो दु:खी होऊन
शोक करत होता.तेव्हा आकाशवाणी झाली
की,तुझी आई
जमिनीतून वर येऊन
तुला दर्शन देईल,फक्त अट
एक आहे की,तू मागे
पाहू नकोस.परंतु
परशुरामाला धीर धरवला
नाही. त्याने मध्येच
मागे बघितले. त्यावेळी
रेणूकामातेचे केवळ मुखच
जमिनीतून वर आले
होते, ते तेवढेच
परशुरामाला दिसले. त्यामुळे या
तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा
होते.
माहूरगडावर वास्तुशास्त्रानुसार बांधलेले कमळाच्या आकाराचे हे मंदिर दुरूनच मन मोहून घेते. सुमारे २५५पाय-या चढून थकलेला जीव रेणूकेचे कमलाकर रक्तवर्ण ,सिंदूरचर्चित मुखकमल पाहून भक्तीने आणि उत्साहाने भारून जातो.देवीचा भव्य तांदळा चांदीचा टोप परिधान केलेला आहे.नजर अतिशय भेदक असून विविध प्रहरात ,उत्सवात मुखकमलावरील भाव बदलत असल्याचा भाव बदलत असल्याचा भास होतो. सभामंडपात देवीच्या सन्मुख परशुराम गणेशरूपात स्थानापन्न आहे.सभामंडपातच देवीच्या डाव्या बाजूला परशुरामाचा पाळणाही आहे.त्यात परशुरामाची मूर्तीही आहे. सभामंडपाच्या दिशेला एक छोटासा खिडकीवजा झरोका आहे.वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट आविष्कार म्हणून या झरोक्याचा उल्लेख केला जातो,ते यासाठी की,पूर्व-पश्चिम रेषेवर जेव्हा वर्षातून फक्त एकदा सूर्य कक्षेत येतो तेव्हा सूर्याची पहिली किरणे रेणूकेच्या मुखकमलावर पडतात. सभामंडपाच्या बाहेर दक्षिणेला पिंपळाचा प्राचीन वृक्ष असून येथे एक शिवलिंग आहे.जमदग्नीचे स्थान म्हणून ते परिचित आहे. गडावर आल्यानंतर रेणूकेच्या दर्शनाच्या आधी या शिवलिंगाचे दर्शन घेण्याचा एक प्रघात आहे. त्यानंतर सभामंडपात प्रवेश केल्यानंतर पाळण्यातील परशुरामाचे दर्शन घ्यायचे आणि मग रेणूकेचे.
मंदिराच्या दक्षिणेला उत्तराभिमुख
आई तुळजाभवानी मातेचे
मंदिर आहे.तर
अलिकडे पूर्वाभिमुख महालक्ष्मी विराजमान
आहे.रेणूका गडाच्यापुढे
प्रभू दत्तात्रेयांचे मंदिर
आणि अत्रीऋषींचा
आश्रम आहे.तर
डाव्याबाजूला रामगड किल्ल्यात कालिकेचे
मंदिर आहे.याच
परिसरात माता अनुसयाचे
मंदीर आहे.गडाच्या
दक्षिणेला पायथ्याशी भगवान परशुरामाचे
मंदिर आहे.रेणूकेच्या
गडावरून पुन्हा शंभर पाय-या उतरून
या मंदिरात जावे
लागते.
रेणूका देवीच्या गडावर
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थाना
करून या उत्सवाला
सुरूवात होते.प्रतिपदा
ते नवमीपर्यंत रोज
तेल व तुपाचा
अखंड नंदादिप तेवत
ठेवला जातो.याकाळात
रोज दहिभात ,पुरणपोळीचा
नैवेद्य दाखविला जातो.नवरात्रातील
पंचमीच्या दिवशी देवीचे मुखकमल
अतिशय प्रसन्न दिसते.यादिवशी देवीची अलंकारपूजा
केली जाते. सूर्यास्तापूर्वी
देवीचे अलंकार उतरवून महाआरती
केली जाते.
सप्तमीच्यादिवशी जवळच असलेल्या
गडावर जाऊन महाकालीची
विधीवत पूजा करून
महाकालीला महावस्त्र अर्पण केले
जाते.अष्टमीच्या पहाटे देवीची
पूजा झाल्यानंतर यज्ञाला
सुरूवात होते.नवरात्रौत्सवात
सप्तशतीचा पाठ सुरू
होतो.यज्ञ सुरू
असताना सप्तशतीच्या आठव्या अध्यायाला
यज्ञ थांबवून देवीची पंचामृतादीने स्नान
घालून पूजा केली
जाते.देवीला नुतन
वस्त्र परिधान केली जातात,नैवेद्य दाखविला जातो.नंतर नवव्या
अध्यायापासून यज्ञास प्रारंभ होतो.अध्याय पूर्ण झाल्यानंतर
अष्टमीच्या यज्ञाची सांगता होते.विजयादशमीला देवीचे मुख्य
निशाण उतरवून त्या
पवित्र खांबाला स्नान घातले
जाते.नंतर निशाणावर
नवीन वस्त्रालंकार चढविले
जातात.हे कापड
एकावन्न मीटर लांबीचे
असते. नंतर
देवीला स्नान घालून शृंगार
पूजा केली जाते.महावस्त्र अर्पण करून
नैवेद्य दाखविला जातो. महाआरतीनंतर
सर्व देवी-देवतां
जवळ निशाण चढविले
जाते.त्यानंतर रेणूकामातेचा
पुत्र परशुरामाची पालखी
मिरवणूक निघते.सीमोल्लंघनासाठी ही
मिरवणूक वरदायिनीच्या डोंगरावर जाते.तिथे
सीमोल्लंघन
करून पुन्हा मिरवणूकीने पालखी परशुरामाच्या मंदिरात येते.रेणूकादेवीच्या द्वारासमोर पालखी आल्यानंतर देवीला आपटारूपी सोने अर्पण केले जाते.महानैवेद्य दाखविला जातो व महाआरतीने या उत्सवाची सांगता होते.देवीला पुरणाच्या नैवेद्याचे महत्व असून आरतीनंतर तांबूल भरविला जातो.
श्रीसप्तश्रृंगी माता,वणी
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्वाचे स्थान म्हणजे नाशिकमधील वणी येथील सप्तश्रृंग गडाला आहे.नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वणी या ठिकाणच्या सप्तश्रृंगी निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून याला अर्धपीठ म्हणतात.नाशिकपासून जवळच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या सात शिखरांच्या सप्तश्रृंग गडावर वसली असल्याने येथील देवीला "सप्तश्रृंगी देवी" असे नाव पडले.
पूर्वी दक्षाने ब्रम्हस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला.या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले.शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. या यज्ञात शिवाला हविरभाग दिला गेला नाही. त्यामुळे सतीने रागाने या यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञात विध्वंस केला.ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरिराचे ५१तुकडे ठिकठिकाणी पडले.हीच ५१ शक्तीपीठे म्हणून गणली जाऊ लागली.प्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करीत आहेत.मानवी जीवनात शक्ती उपासनेला अविशेष महत्व दिले आहे.श्री जगदंबेची ५१ शक्तीपीठे भूतलावर असून उपासकांना त्यापासून लाभ झाला आहे.
महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन शक्तीपीठे आहेत.तुळजापूरची तुळजाभवानी,कोल्हापूरची महालक्ष्मी,माहूरची महाकाली आणि वणीची सप्तश्रृंगी देवी आहे.या शक्तीपीठांपैकी महाकाली,महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचा त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्हस्वरूपिणी,धर्मपीठ ओंकारस्वरूप अधिष्ठाता आहे आणि तेच म्हणजे सप्तश्रृंग गडावरील श्री सप्तश्रृंगी देवी होय. सप्तश्रृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या नावांनीदेखील ओळखले जाते.
महिषासूराने भूलोकावर त्राही माजवली होती.सर्व देवांनी आपले तेज एकत्र केले तर त्या दैत्याचा नाश होईल,असे ठरले.त्यानुसार सर्व देवांनी आपले तेज मुखावाटे सोडले आणि त्यात आदिमायेने प्रवेश केला.त्यातून देवीचे अष्टादश रूप निर्माण झाले.देवीने सुंदर तरूणीचे रूप घेऊन जो युद्धात मला जिंकेल त्यालाच मी पती समजेन असे महिषासूराला सांगितले.त्यानंतर नऊ दिवसांच्या युद्धात देवीने महिषासूराचा वध केला आणि त्यानंतर याच गडावर विश्रांती घेतली,अशी आख्यायिका आहे.दुष्टशक्तीच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले.
देवीची मूर्ती शेंदूरचर्चित असून आठ फूट उंचीची आहे.तेजस्वी डोळे,धारदार नाक व डोईवर मुकूट आहे.देवीच्या अठरा हातात,अठरा वस्तू आहेत.त्यात तलवार,वज्र,गदा,चक्र,त्रिशूळ घंटा यांचा समावेश आहे.ही देवी पूर्वाभिमुख सिंहासनावर उभी आहे.सप्तश्रृंगी देवीबरोबरच गडावर सूर्यकुंड,जलगुंफा,
शिवतीर्थ,तांबूलतीर्थ,मार्कण्डेय ऋषींचा मठ,शीतकडा इ. महत्वाची पवित्र तिर्थस्थळे आहेत.गडावर गुढीपाडवा , चैत्रोत्सव ,गोकुळाष्टमी, नवरात्रौत्सव,कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादि महत्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तीभावाने संपन्न होत असतात.
अशी ही महाराष्ट्रातील देवींची साडे तीन शक्तुपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात.येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तीभावाने देवींची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात.
लेखक- राजेंद्र साळसकर
भ्रमणध्वनी-९३२३१८४१४२.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times