संकेत सावंत सोबत ना 'ले पंगा'
गिरणगावातल्या मुलाची गगन भरारी
कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. कबड्डी हा एक प्राचीन भारतीय खेळ आहे आणि भारतात जवळजवळ सर्वत्र तो लोकप्रिय आहे. तज्ञांच्या मते महाभारताच्या काळात अभिमन्यूने या खेळाची सुरुवात केली होती. काही लोकांच्या माहितीनुसार कबड्डी हा खेळ भारतामध्ये चार हजार वर्षांपासून खेळाला जातो. मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, जपान इत्यादी देशात खेळला जातो. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झाला. हे सगळं इथे सांगायचं कारण म्हणजे आज मातीतला हा खेळ मॅटवर खेळला जात आहे. १९५० ते २०२१ असा हा ७१ वर्षांचा प्रवास खरंच थरारक आहे. त्यामुळेच आजही तरूणांना या खेळाचं तितकंच आकर्षण आहे.
असच आपल्या दमदार खेळाने आपल्या नावाचा ठसा उमटवणारा, अस्सल मराठी रांगडा गडी, मराठी बाणा ताठ कणा असा मराठा पठ्ठा संकेत सावंत आज सलग दोन वर्षे प्रो कब्बडी लीग मध्ये पुणेरी पलटण मध्ये आपला खेळ दाखवत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. संकेत सावंत गिरणगावातील जिजामाता नगर वसाहतीमधून लहानाचा मोठा झाला. चाळ संस्कृती ही मुंबईची ओळख. इथे साजरे होणारे सण-उत्सव-खेळ यांची मज्जाच काही वेगळी असते. गिरणगावातील चाळीतून थेट प्रो कबड्डी लिगपर्यंत जाण्याचा प्रवास तसा सोपा नव्हता. पण अथक संघर्ष करत संकेतने ही किमया साधली आहे.
शाळेपासूनच कब्बडीची आवड असणाऱ्या संकेतने पुढे जाऊन साईराज स्पोर्ट्स क्लब, अमर क्रिडा स्पोर्ट्स क्लब यांसारख्या क्लबमध्ये आपला खेळ अजून मजबूत केला. याच ठिकाणी संकेतची ओळख नितिन विचारे आणि राजेश पाडावे या गुरूंसोबत झाली आणि त्यांनीच संकेतचा खेळ बघून, त्याला मुंबई शहर, देना बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एअर इंडिया मधून खेळण्यची संधी दिली. याचदरम्यान संकेतने वरिष्ठ राष्ट्रीय महाराष्ट्र २०१८-१९ मध्ये आपल्या दमदार खेळाची ओळख अवघ्या कबड्डी विश्वाला करून दिली. पुढे एअर इंडिया मधून खेळत असताना, संकेतला संजय सूर्यवंशी आणि अशोक शिंदे हे गुरू लाभले. या गुरूंच्या प्रयत्नांनी आणि नेहमीप्रमाणे आपल्या जिगरबाज खेळाच्या जोरावर संकेतने प्रो कब्बडी लीगच्या पुणेरी पलटण या संघामध्ये डिफेन्डर म्हणून खेळायची संधी मिळवली आणि आता सलग दोन वर्षे संकेत पुणेरी पलटण मधून डिफेन्डर म्हणून खेळत आहे. त्याच्या खांद्यावर येणारी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे. सामाजिक स्तरावर सुद्धा संकेत सावंत याची कामगिरी कमालीची आहे. संकेतने त्यांच्या काही मित्रांसोबत मिळून "स्वराज्य फाउंडेशन" या संस्थेची पायाभरणी केली. आपल्या सारखेच अनेक तरुण विविध क्षेत्रांमध्ये आपले नावं मोठं करत आहे, त्या सगळ्यांना एकाच छताखाली आणत त्यांच्यासाठी आणि समस्त समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने संकेतने या संस्थेचा शिलेदार बनला.
संकेतने गप्पांच्या ओघात सांगितले की, आपल्या होमग्राऊंडवर खेळण्याचा अनुभव आणि प्रो कब्बडी लीग सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव खूप जास्त वेगळा असतो. तुम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर एका संघामधून खेळत असता, तेव्हा तुमच्याकडे साऱ्यांचं लक्ष असतं, कारण तिकडे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा तुमच्या सोबत एकाच मैदानावर खेळत असतात आणि म्हणूनच थोड्या प्रमाणात दडपण हे येतेच. यावेळी पुणेरी पलटण संघाचे प्रशिक्षक म्हणून यु मुंबा या संघाचे माजी कर्णधार सुपर रेडर अनुप कुमार यांचं मार्गदर्शन लाभत आहे. अनुप कुमार यांच्याबद्दल बोलताना संकेतने त्यांना नेहमीप्रमाणे 'कॅप्टन कुल' अशी उपमा दिली. अनुप सर हे नेहमीच आम्हांला सांभाळून घेतात, खेळत असताना कोणतं तंत्र कुठे वापरावं, कसं वापरावं याबद्दलची सगळी माहिती एका मोठ्या भावाप्रमाणे देतात, अशा शब्दांत अनुप कुमार यांचं कौतुक केलं.
सलग दोन वर्षे पुणेरी पलटण मधून डिफेन्डर म्हणून खेळणारा आपल्या मराठी मातीतला हा पठ्ठा सगळ्यांचेच लक्ष वेधत आहे. इतर संघांचे खेळाडू संकेत सावंत सोबत ना 'ले पंगा' असं आपल्या सहकार्यांना सांगत आहेत. जिजामाता नगर अभ्युदय नगर काळाचौकी लालबाग परळ मधून पुढे येत, आपला मराठमोळा छावा यावर्षी सुद्धा आपल्या संयमी खेळाने, आपल्या बुद्धिमत्तेने सगळ्यांचे मनोरंजन करताना आपल्या संघाचे सुद्धा नाव करेल यात काही वाद नाही.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times