रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची विजयासाठी शर्थीची झुंज

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा सहावा सामना चुरशीचा झाला. बेंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कोलकत्ता कडून खेळाची सुरूवात करायला अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर उतरले. दोघांनाही धावा काढण्यासाठी खूपच कष्ट करावे लागत होते. ४थ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर आकाशदीपने स्वतःच्याच गोलंदाजीवर व्यंकटेशला झेलबाद केले. पुढच्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर अजिंक्य रहाणे बाद झाला. त्याला महम्मद सिराजने शाहबाझ अहमद करवी झेलबाद केले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी डाव सावरण्यासाठी प्रयत्न केले, पण ते व्यर्थ ठरले. राणा ६व्या षटकात तर श्रेयस ७व्या षटकात तंबूत परतले. कोलकत्त्याची अवस्था ४६/४ अशी झाली होती. सुनील नरीन कडून अपेक्षा वाढल्या होत्या. वाणींदू हसरंगा याच्य‍ा गोलंदाजीवर आकाशदीपने पॉइंटवर त्याचा सुरेख झेल टिपला. पुढच्याच चेंडूवर हसरंगाने शेल्डन जॅकसनला शून्यावर बाद करताना त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. ९व्या षटकाच्या अखेरीस कोलकत्त्याची अवस्था ६७/६ अशी दयनीय झाली होती. अजून ११ षटकांचा खेळ बाकी होता. सॅम बिलिंग्स १२व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. त्याला हर्षल पटेलने विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. हर्षल पटेलने सामन्यातलं हे पहिलंच षटक टाकलं होतं. संघाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी आंद्रे रसेलवर आली. पण त्यालाही हर्षल पटेलने दिनेश कार्तिककडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने १ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने १८ चेंडूंत २५ धावा काढल्या. धावफलक ९९/८ दर्शवत होता. टीम साऊथीने सावध पवित्रा घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण तोही वाया गेला. वाणींदू हसरंगाने फाफ ड्यू फ्लेसिसकडे त्याला झेल देण्यास भाग पाडले. हसरंगाचा हा सामन्यातला चौथा बळी होता. १४.३ षटकांत कोलकत्याचा संघ १०१/९ अशा दयनीय अवस्थेत होता. उमेश यादव आणि चक्रवर्थीने १०व्या जोडीसाठी ४ षटकांत २७ धावा जोडल्या. उमेश यादवने दोन चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १२ चेंडूंत १८ धावा काढल्या. आकाशदीपने त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. कोलकत्याचा संघ डावातले ७ चेंडू बाकी असतानाच १२८/१० अशा अवस्थेत तंबूमध्ये परतला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू कडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार फाफ ड्यू फ्लेसिस आणि अनुज रावत उतरले. पण उमेश यादवने पहिल्याच षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर रावतला शून्यावरच शेल्डन जॅकसनकडे झेल देण्यासाठी भाग पाडले. दुसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर फाफ ड्यू फ्लेसिस बाद झाला. टीम साऊथीने त्याला अजिंक्य रहाणे कडून झेलबाद केले. मधल्या काळात विराट कोहलीने झटपट दोन चौकाराच्या सहाय्याने ७ चेंडूंत १२ धावा जमा केल्या. उमेश यादवने डावाच्या तिसर्‍या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीला शेल्डन जॅकसनकडे झेल देण्यासाठी भाग पाडले. बेंगळुरू १७/३ अशा बिकट अवस्थेत सापडला. त्यांना विजयासाठी १०७ चेंडूंत ११२ धावा काढायच्या होत्या आणि प्रारंभिक तीन फलंदाज तंबूमध्ये परतले होते. सामना दोलायमान अवस्थेत पोहचला होता. चौथ्या जोडीसाठी डेव्हिड विले अाणि रुदरफोर्डने ४० पेक्षा जास्त धावा संघाच्या खात्यावर जोडल्या. डेव्हिड विलेला सुनील नरीनने नितीश राणाकडे झेल देण्यासाठी भाग पाडले. बेंगळुरू ६२/४ अशा बिकट अवस्थेत सापडला. त्यांना विजयासाठी अजूनदेखील ५४ चेंडूंत ६७ धावांची गरज होती. शाहबाझ अहमदने आक्रमक पवित्रा धारण केला होता. जणू विजय त्याला काही षटके बाकी ठेवून मिळवायचा होता. पण वरुण चक्रवर्थीने पद्धतशीर त्याला क्रिझबाहेर आणले आणि यष्टिरक्षक शेल्डन जॅकसनने उर्वरित कामगिरी पार पाडली. त्याने ३ षटकारांच्या सहाय्याने २० चेंडूंत २७ धावा काढल्या. बेंगळुरूला विजयासाठी अजूनदेखील २४ चेंडूंत २८ धावांची गरज होती. १८व्या षटकाच्या दुसर्‍याच चेंडूवर टीम साऊथीने रुदरफोर्डला शेल्डन जॅकसनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने १ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ४० चेंडूंत २८ धावा काढल्या. टीम साऊथीने ह्या एकाच षटकात वाणींदू हसरंगालाही परतीचा रस्ता दाखवला. बेंगळुरू १११/७ अशा अवस्थेत सापडला. त्यांना विजयासाठी अजूनदेखील १३ चेंडूंत १८ धावांची गरज होती. सामना कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आणि दिनेश कार्तिकने त्याचं  संघातलं स्थान काय हेच जणू सिद्ध केलं. त्याने हर्षल पटेलच्या जोडीने सामन्याचं चित्रच बदललं. पुढच्या ९ चेंडूंत त्यांनी सामना बेंगळुरूच्या पारड्यात झुकवला. २०व्या षटकात ६ चेंडूंत ८ धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसर्‍या चेंडूवर चौकार मारत दिनेश कार्तिकने सामना झटपट संपवला. त्याने १ चौकार आणि १ षटकाराच्या सहाय्याने ७ चेंडूंत बिनबाद १४ धावा काढल्या. तर हर्षल पटेलने २ चौकारांच्या सहाय्याने ६ चेंडूंत बिनबाद १० धावा काढल्या. पण बेंगळुरूला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे हे खरे. 
कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने कमी धावसंख्या असताना मैदानवर दाखवलेली समयसूचकता बेंगळुरूच्या विजयामध्येही सर्वांच्या नजरेत भरली. भारतीय संघाच्या तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सध्या कर्णधारपद भूषवणार्‍या रोहित शर्माच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. के. एल. राहुल त्या स्पर्धेत किती टिकेल याची शंका असतानाच श्रेयस अय्यर सारखा हरजबाबी खेळाडू तयार होत आहे, ह्याचा भारतीय  क्रिकेटप्रेमींना मोठा आनंद होईल. 
वाणींदू हसरंगालाला सामन्याचा खेळाहू हा बहुमान देण्यात आला. त्याने ४ षटकांत केवळ २० धावांच्या मोबदल्यात ४ महत्वाचे बळी टिपले.   
उद्याचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ आपला पहिला विजय नोंदवण्यास आसूसलेले आहेत. चेन्नईचे पारडे जरी जड दिसत असले तरीही लखनौचे डावपेच उद्या सामन्याचा निकाल ठरवतील.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट