पंजाब किंग्सचा मोठ्या फरकाने विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चेन्नई सुपर किंग्स् आणि पंजाब किंग्स् यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा अकरावा सामना पंजाब किंग्सने जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंजाब किंग्सकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार मयंक अगरवाल आणि शिखर धवन उतरले. मुकेश चौधरीने पहिल्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर मयंकला बाद केले. रॉबिन उतप्पाने त्याचा झेल टिपला. त्याच्या जागी आलेल्या भानूका राजपक्षाला ख्रिस जॉर्डनने स्वस्तात धावबाद केले. त्यावेळी धोनीने दाखवलेली समयसूचकता खास होती. धवन आणि लिअाम लिव्हिंगस्टोन यांनी डावाला आकार देण्यास सुरूवात केली. लिव्हिंगस्टोनचे खास फटके पाहून धवनही झटपट धावसंख्या वाढवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत होता. १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर ड्वेन ब्राव्होने त्याला बाद केले. चार चौकार आणि एक षटकार यांच्या सहाय्याने धवनने २४ चेंडूंत ३३ धावा काढल्या. रवींद्र जडेजाने त्याचा झेल टिपला. जम बसलेली जोडीतला एक फलंदाज बाद झाला की दुसराही लगेच बाद होतो. ह्याचा प्रत्यय पुढच्याच षटकाच्या चौथ्या चेंडूंवर आला. जडेजाने लिव्हिंगस्टोनला अंबाती रायडूकडे झेल देण्यास भाग पाडले. प्रत्येकी पाच चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूंत महत्वपूर्ण ६० काढल्या. जितेश शर्माने केवळ १७ चेंडूंत ३ षटकारांच्या सहाय्याने २६ धावा काढल्या. त्याला ड्वेन प्रिटोरियसने बाद केले. शाहरूख खानची बचावात्मक खेळी ख्रिस जॉर्डनने भेदली. ख्रिस जॉर्डनने लागोपाठच्या षटकात ओडिअन स्मिथला परतीचा मार्ग दाखवला. राहुल चहरने झटपट १२ धावा काढल्या तितक्याच वेगाने परत तंबूत गेला. ड्वेन प्रिटोरियसने त्याला बाद केले. कगिसो रबाडा आणि वैभव अरोरा बिनबाद तंबूत परतले. २० षटकांत पंजाबने १८०/८ धावा जमा केल्या होत्या. चेन्नईच्या संघाला हे आव्हान सहज पेलता येईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण क्रिकेटचा सामना कागदावर नाही तर मैदानात खेळून जिंकावा लागतो हे आज पुन्हा मयंक अगरवालने सिद्ध करून दाखवले. 
चेन्नई सुपर किंग्स् कडून खेळाची सुरूवात करायला रॉबिन उतप्पा आणि ऋतुराज गायकवाड उतरले. रॉबिन त्याच्या नेहमीच्या अंदाजात धावा गोळा करत होता तर गायकवाड तणावात होता. त्याच संधीचा फायदा कगिसो रबाडाने घेतला. त्याने गायकवाडला तंबूचा रस्ता दाखवला. रॉबिनही पुढच्याच षटकात वैभव अरोराच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठच्या षटकांत वैभव अरोराने मोईन अलीला शून्यावर बाद केले. पुढच्याच षटकात अर्शदीप सिंगने शून्यावर कर्णधार रवींद्र जडेजाची पाठवणी केली. अंबाती रायडू आणि शिवम दुबे योग्य ताळमेळ साधत डावाला आकार देत होते. ओडिअन स्मिथने रायडूला बाद करून चेन्नईची वाट अडवली. शिवम दुबे आणि महेंद्रसिंग धोनीने पिक्चर अभी बाकी है म्हणत चौफेर टोलेबाजी सुरू केली. त्याचवेळी मयंकने गोलंदाजीत महत्वाचा बदल केला. लिअाम लिव्हिंगस्टोन पुन्हा पंबाज संघासाठी तारणहार म्हणून पुढे आला. त्याने ही चांगली जमलेली जोडी फोडली. शिवम दुबेला त्याने अर्शदीप सिंगकडे झेल देण्यास भाग पाडले. दुबेने ६ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३० चेंडूंत ५७ धावा काढल्या. धोनी एका बाजूने किल्ला लढवत होता पण त्याच्या समोर झटपट गडी बाद होत होते. चेंडू कमी आणि लक्ष प्रचंड मोठं अशी अवस्था असताना धोनीही बाद झाला. त्याने २३ धावा काढल्या. चेन्नईच्या डावाची दोन षटके बाकी असताना १२६ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला होता. रवींद्र जडेजाला कर्णधारपदाचं ओझं झेपत नाही हे पुन्हा प्रकर्षाने जाणवलं. त्याचवेळी मयंक अगरवालने गोलंदाजीत केलेले बदल महत्वाचे ठरले. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात पंजाबाने चेन्नईला धोबीपछाड दिली. आणि त्याचीच परिणीती आजच्या विजयात दिसून आली. ५४ धावांनी मिळवलेला विजय पंजाब संघाचे आणि मयंक अगरवालचे मनोधैर्य उंचावणारा आहे. लिअाम लिव्हिंगस्टोनला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजी करताना ६० धावा काढल्या तर गोलंदाजी करताना ३ षटकांत २५ धावांच्या मोबदल्यात २ महत्वाचे गडी बाद केले होते. 
उद्या सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबाद आपला पहिला विजय ह्या सामन्यात शोधत आहे.
Attachments area

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट