ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन



मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे वयाच्या ७४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी मुलगा सून आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

 

मुखेड (जि. नांदेड) येथे २९ मार्च १९४८ रोजी जन्मलेल्या नागनाथ कोत्तापल्ले यांनी साठोत्तरी कालखंडात कविता कथा दीर्घकथा कादंबरी ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती केली. १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले. १९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.


१९८० मध्ये औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉ. यु. म. पठाण सरांच्या मार्गदर्शनाने शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएच. डी. चं संशोधन केलं. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते तसेच २००५ पासून २०१० पर्यंत कोतापल्ले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं. दरम्यान नॅक राज्य मराठी विकास संस्था साहित्य अकादमी राज्य ग्रंथ पुरस्कार समिती बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असं कामही त्यांनी पाहिलं. 


कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार


पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार -मूड्स (१९७६)संदर्भ (१९८४)गांधारीचे डोळे (१९८५)ग्रामीण साहित्य (१९८५)उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२) ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध साठी परिमल पुरस्कार (१९८५) ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१) राख आणि पाऊस साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५) राख आणि पाऊस साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५) साहित्य अवकाश साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार


अभिजात लेखणी शांत झाली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


ज्येष्ठ साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली आहे या शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मुनगंटीवार म्हणाले कविता कथा दीर्घकथा कादंबरी ललित गद्य आणि समीक्षा या साहित्यप्रकारांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या प्रा. कोतापल्ले यांनी आपल्या लेखनातून समाजाला दिशा देत नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. साहित्यिक म्हणून ते जितके परिचित होते तितकाच त्यांनी कुलगुरु पदावर आपला ठसा उमटवला. एक अध्यापनकुशल आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे योगदान मोठे होते. महात्मा फुले यांच्या जीवनावरील डॉ. कोतापल्ले यांचा ज्योतीपर्व हा ग्रंथ सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. कुलगुरु असताना कॉपीमुक्त विद्यापीठ अभियान राबविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राज्य सरकारच्या मराठी राजभाषा धोरण विषयक समितीवर काम करताना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रा. कोतापल्ले यांच्या निधनाने साहित्य आणि शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर प्रा.नागनाथ कोतापल्ले यांना सद्गती देवो. कोतापल्ले कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट