मुंबई : संपूर्ण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वायू, धुळीचे प्रदूषण मुंबईकरांना भेडसावत आहे. हवेचा दर्जा खालावला असून सकाळी धुरके आणि दुपारी उन्हाच्या चटक्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मुंबईच्या चेंबूर भागातील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद झाली आहे तर, सोमवारी (23 ऑक्टोबर) मुंबईचा एक्यूआय 127 एवढा होता. त्यामुळे मुंबईतील काही भागात ‘मिस्ट मशीन्स’चा वापर केला जात आहे.
मुंबईची हवा प्रदूषित झाल्यामुळे पालिका प्रशासन खडबडू जागी झाली असून घाईगडबडीत बैठका घेऊन उपाययोजनांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेने रविवारी (22 ऑक्टोबर) सुट्टीच्या दिवशी प्रदूषण नियंत्रणासाठी शहर भागातील वरळी सी फेस, हाजी अली, पेडर रोड, स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), नरिमन पॉईंट, फॅशन स्ट्रीट, बधवार पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर यांसारख्या महत्वाच्या आणि पॉश परिसराला प्रथम प्राधान्यक्रम देत ‘मिस्ट मशीन्स’चा वापर केला.
मुंबईतील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक खालावत चालला आहे. मुंबईच्या वातावरणात सकाळी गारवा जाणवत असला, तरी हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्याने श्वसनविकारांनी ग्रस्त रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांना अस्थमासारख्या आजाराचा त्रास
मुंबईतील प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांच्या श्वसनमार्गावर आणि फुप्फुसाला परिणाम होत आहे. त्यामुळे दमा, कर्करोग, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यांतून पाणी येणे इत्यादी आजार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे. याशिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना धुरक्यामुळे अस्थमासारख्या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे.
यामुळे वाढलेय धुळीचे प्रदूषण
मुंबईत सध्या वरळी, परळ, घाटकोपर, दादर, भायखळा, भांडुप, मुलुंड, मालाड, अंधेरी, बोरिवली आदी ठिकाणी एसआरए प्रकल्प, खासगी जागेत इमारत पुनर्विकास, शासकीय, पालिका जागेत इमारत बांधकामे अशी सहा हजार इमारत बांधकामे सुरू आहेत. या इमारतीच्या ठिकाणी इमारत पाडकाम, लादी, टाईल्स कटिंग करणे, डेब्रिजचा ढिगारा उचलणे आदी कारणांमुळेही धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास धूळ उडते आणि या धुळीमुळे प्रदूषण वाढते. तसेच, चेंबूर माहुल परिसरात रिफायनरी आहेत. केमिकल कंपन्या आहेत. मुंबादेवी, काळबादेवी परिसरात सोन्याचे दागिने घडविणारे कारखाने असून कारागीर केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. त्याचप्रमाणे मुंबईत ठिकठिकाणी पावखारी, बटर बनविणाऱ्या बेकऱ्या असून त्याद्वारेही काळाकुट्ट धूर निर्माण होतो. त्यामुळे प्रदूषणाला काही प्रमाणात हातभार लागतो. त्याचप्रमाणे, मुंबईत वाहनांची वाढती संख्या पाहता पेट्रोल, डिझेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे इंधन जळून त्याद्वारेही वायू प्रदूषणात भर पडत आहे.
मुंबईत सर्वाधिक प्रदूषित हवा कुठे?
वरळी – 99
भांडुप – 106
अंधेरी – 110
मुंबई शहर – 127
माझगाव – 127
बोरिवली – 130
मालाड – 131
कुलाबा – 142
नवी मुंबई – 152
बीकेसी – 190
चेंबूर – 200

रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times