३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदक कमाई
महाराष्ट्र पदकतालिकेत अग्रस्थानावर
क्रीडा प्रतिनिधी, पणजी
गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राकडून वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदककमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके मिळवली, तर जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली. महाराष्ट्राने ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण १२ पदके मिळवून पदकतालिकेत अग्रस्थान राखले आहे. सेनादल दुसऱ्या स्थानावर आहे.
*
वेटलिफ्टिंग
दोन राष्ट्रीय विक्रमांसह दिपाली गुरसाळेचे सोनेरी यश
मुकुंद आहेरला रौप्य आणि शुभम तोडकरला कांस्य पदक
वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांची कमाई
दिपाली गुरसाळेने गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बुधवारी दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांसह वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक पटकावले. याचप्रमाणे मुकुंद आहेरने रौप्य आणि शुभम तोडकरने कांस्य पदक प्राप्त केले. कॅम्पल मैदानावर सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तीन पदकांची कमाई केली.
महिलांच्या ४५ किलो वजनी गटात दीपाली गुरसाळेने स्नॅचमध्ये ७५ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये ९० किलो असे एकूण १६५ किलो वजन उचलले. यातील स्नॅच ७५ किलो आणि एकूण वजन १६५ किलो असे दोन राष्ट्रीय विक्रम तिने नोंदवले. पश्चिम बंगालच्या चंद्रिका तरफदारीने एकूण १६२ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले. चंद्रिकाने क्लीन अँड जर्कमध्ये ९५ किलो वजनासह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तर तेलंगणाच्या टी प्रिय दर्शिनीने (१६१ किलो) कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्राची आणखी एक स्पर्धक सारिका शिंगरेला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या ५५ किलो गटात आहेरने स्नॅचमध्ये ११२ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये १३७ किलो असे एकूण २४९ किलो वजन उचलले. या गटात सेनादलाच्या प्रशांत कोळीने सुवर्णपदकावर नाव कोरले. प्रशांतने स्नॅचमध्ये ११५ किलो आणि एकूण २५३ किलो वजन उचलून दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. २३० किलो वजन उचलणाऱ्या आंध्र प्रदेशच्या एस गुरू नायडूला कांस्यपदक मिळाले.
पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात शुभम तोडकरने २६३ किलो वजन उचलून कांस्य पदक संपादन केले. त्याने स्नॅचमध्ये ११५ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये १४८ किलो वजन उचलले. सेनादलाच्या चारू पेसीने २६७ किलोसह सुवर्ण आणि सिद्धांत गोगोईने २६६ किलोसह रौप्य पदक मिळवले.
महिलांच्या ४९ किलो वजनी गटात साक्षी मस्केची कामगिरी सातव्या क्रमांकाची ठरली, तर ५५ किलो गटात अनन्या पाटीलला पाचवा क्रमांक मिळाला.
*
दिपालीची कामगिरी कौतुकास्पद -अजित पवार
महाराष्ट्राची युवा वेटलिफ्टर दिपालीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत. तिची हीच कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. यामुळे निश्चितपणे राज्यातील युवा खेळाडूंनाही यातून प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे दिपाली ही महाराष्ट्रातील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. तिच्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिपालीवर कौतुकाचा वर्षाव केला.
*
जिम्नॅस्टिक्स
महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्स संघाला सुवर्ण
*आदर्श भोईरची सुवर्ण कामगिरी; आयुष मुळे, श्रद्धा तळेकरला कांस्य *
जिम्नॅस्टिक्समध्ये चार पदके
गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारामध्ये बुधवारी महाराष्ट्राने दोन सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली. महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्स सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने एकूण २४०.९० गुणांची कमाई करताना सोनेरी यश मिळवले. या संघात रिचा चोरडिया, संयुक्ता काळे, निशिका काळे आणि किमया काळे यांचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षिका मधुरा तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. जम्मू काश्मीर संघाला रौप्य पदक मिळाले तर हरियाणा संघाला कांस्य पदक मिळाले.
याचप्रमाणे पुरुषांच्या ट्रॅंपोलिन क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या आदर्श भोईरने सुवर्ण आणि आयुष मुळेने कांस्य पदक मिळवले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना प्रामुख्याने सेनादल व केरळच्या खेळाडूंचे आव्हान होते. भोईरने ४८.३७ गुणांची कमाई केली आणि सुवर्णपदक जिंकले. त्याचा सहकारी आयुषने कांस्य पदक मिळवताना ४६.१२ गुण नोंदविले. सेनादलाच्या मनू मुरलीने ४६.७० गुणांसह रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या या दोन्ही खेळाडूंना संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच महिलांच्या सर्वसाधारण विभागात महाराष्ट्राच्या श्रद्धा तळेकरने कांस्यपदक जिंकले. तिला उडीसाची ऑलिम्पिकपटू प्रणिती नायक आणि पश्चिम बंगालची आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणती दास यांचे आव्हान होते. श्रद्धाने त्यांना चांगली लढत दिली आणि ४१.४५ गुणांसह तिसरे स्थान घेतले. नायकने ४५.६० गुणांसह सुवर्णपदक जिंकले तर दासने रौप्यपदक जिंकताना ४३.९५ गुण नोंदवले.
रग्बी
महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी
रग्बी 7-एस स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी झाले. महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटकला ४८-० असे नामोहरम केले. तसेच पुरुष गटात महाराष्ट्राने बिहारचा १९-१२ असा पराभव केला.
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times