ठाकरे गटाकडून हल्लाबोल : देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तोडगा व सेटलमेंटचे दुकान

मुंबई : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. यासोबतच आज सोमवारी (30 ऑक्टोबर) आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र, या सर्व घडामोडी आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेच्या अपात्रतेवरून केलेल्या सूचक वक्तव्याचा ठाकरे गटाने समाचार घेतला आहे. आजच्या ‘सामना’ च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तोडगा व सेटमेंटचे दुकान असल्याची जहरी टीका फडणवीस यांच्यावर करण्या आली आहे. त्यामुळे पुढील काळात भाजप-विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

‘सामना’ च्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज माध्यमांवर ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडीओ टाकून खळबळ उडवली. उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावरून लक्ष उडविण्याचा हा डाव असावा. फडणवीस आता सारवासारवी करतात की, ‘‘पुन्हा येईनचा व्हिडीओ टाकून मी परत कशाला येऊ?’’ फडणवीस यांचे विधान हास्यास्पद व राजकारण पोरकटपणाचे आहे. त्यांच्या मनातली उबळ वारंवार वर येत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न भडकला आहे व सरकार सैरभैर झाले आहे. आता गावागावांत साखळी उपोषणे सुरू झाली आहेत व राजकीय नेत्यांना गावबंदी करून रोष प्रकट केला जात आहे. राज्याच्या अनेक मंत्र्यांच्या कार्यक्रमांत गोंधळ घातला जात आहे. मंत्र्यांना कॉलर पकडून जाब विचारला जात आहे. आतापर्यंत चार जणांनी आत्महत्या केल्या, पण सरकारला मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा सापडत नाही. फडणवीस यांच्याकडे तोडगा व सेटलमेंटचे दुकान आहे असे म्हणत एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले तर लगेच त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचवू, असा तोडगा त्यांनी दिला. फडणवीसांचे डोके नाना फडणवीसांचे असेल असे वाटले होते, पण ते पुण्याच्या तत्कालीन कारस्थानी कोतवालाचे दिसते. शिंदे यांना विधान परिषदेवर आणून मुख्यमंत्रीपदी टिकवले जाईल, पण अपात्र ठरणाऱ्या इतर मंत्री व आमदारांना कसे टिकवणार? असा प्रश्न उपस्थित करत फडणवीस शिंदे यांना टिकवणारा तोडगा देत आहेत, पण मराठा आंदोलनकर्त्यांचा जीव वाचविणारा तोडगा देत नाहीत असा आरोपसुद्धा ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. राज्यातील बेकायदेशीर मिंधे सरकार टिकवणे ही त्यांची प्राथमिकता आहे. मराठय़ांची गरीब पोरे उपोषणानं मेली तरी चालतील, असाच एकंदरीत कावा दिसत असल्याचे म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

हेही वाचा : आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या

पंतप्रधानांचे हे अफझलखानी धोरण

आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्य सरकारसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात-शिर्डीत येऊन गेले. ते शरद पवारांवर बोलले, पण मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणावर आणि आंदोलनावर बोलले नाहीत. गावागावांत उपोषणकर्त्यांचे जीव जात असताना पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन राजकीय चिखलफेक करतात, भाजपचा प्रचार करतात. हे अफझलखानी धोरण आहे. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याचाही अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे.

अचानक न्यूनगंड त्यांना का वाटावा?

‘सामना’ च्या आजच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांनी टिव्ही 9 मराठी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या जातीचा उल्लेख करून मला टार्गेट केले जाते असे वक्तव्य केले होते. त्यांच्या त्या वक्तव्याचाही आजच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, फडणवीस यांच्यावर टीका केली की ते सांगतात, ‘‘मी ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केले जाते.’’ स्वतः ब्राह्मण असल्याचा असा अचानक न्यूनगंड त्यांना का वाटावा? पेशव्यांच्या राघो भरारीबद्दल समस्त मराठय़ांना अभिमान आहे. चापेकर बंधू, टिळक, वीर सावरकर, क्रांतिवीर फडके यांच्या शौर्याच्या आड ब्राह्मणत्व आले नाही. न्यायप्रिय रामशास्त्री हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत. नितीन गडकरी यांच्याविषयी कोणी चुकीची भाषा वापरत नाही. मुख्य म्हणजे फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिली दोनेक वर्षे महाराष्ट्राने त्यांना डोक्यावरच घेतले होते. फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते मुख्यमंत्री नकोत, असा पवित्रा महाराष्ट्रातील बहुजन समाजाने कधीच घेतला नाही व फडणवीस यांच्या विरोधात कोणी आंदोलन केले नाही. मोदींच्या मनात आले म्हणून फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. यापेक्षा तेव्हा त्यांची कर्तबगारी नव्हती. फडणवीस यांनी त्यांच्या पोटातले कारस्थानी दात बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रात त्यांच्याविषयी रोष निर्माण होऊ लागला.

फडणवीस यांनी स्वतःच आपले नेतृत्व आणि प्रतिमा नष्ट केली आहे. महाराष्ट्राने अंतुले यांच्या रूपाने मुसलमान, सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने कर्तबगार दलित मुख्यमंत्री स्वीकारला व मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ब्राह्मण होते. महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र कर्तबगारी व शौर्याला मानतो. ढोंग व कारस्थानाचा तिरस्कार करतो असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट