मुंबईला पुन्हा पावसाने झोडपले

मुबई : 

 मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी सकाळी अधिक वाढला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून हिंदमाता, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, परळ, लालबाग आणि अनेक सखल भाग पाण्याखाली गेला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मिठी नदी ओसंडून वाहू लागल्यामुळे वांद्रे, बीकेसी, माहीम परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मिठी नदीची पाणी पातळी सध्या 4.7 मीटरवर पोहोचली आहे. असाच काही तास पाऊस सुरु राहिल्या, मिठी नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन माहीम, कुल्हा, साकीनाका या भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र उपनगरामध्ये अजुनही जोरधार कोसळत आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तसेच आता रेल्वे प्रशासनाने सीएसटीएम ते ठाणे दरम्याची रेल्वे वाहतूक सुरु झाल्याचे जाहीर केले.

रेल्वे सेवा ठप्प, प्रवासी अडकले

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने सकाळपासूनच मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाण्यापर्यंत अप मार्गावरील गाड्या काही प्रमाणात सुरू असल्या तरी ठाणे ते सीएसटी मार्गावरील सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत स्थानकांवर सातत्याने उद्घोषणा केल्या जात आहेत. ठाणे स्थानकावर अनेक प्रवासी गेल्या दोन तासांपासून अडकून पडले असून, काही लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्याही रद्द झाल्या आहेत, तर काही उशिराने धावत आहेत. पावसाचा जोर कमी न झाल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

रस्त्यांवर नदीचे स्वरूप, वाहतूक बंद

मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर पाण्याने नदीचे स्वरूप घेतले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या कलिना जंक्शनमध्येही पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणी तुंबल्याने वाहनचालकांचेही हाल झाले आहेत.

मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ, ३५० जणांचे स्थलांतर

मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणीपातळी ३.९ मीटरपर्यंत वाढली आहे. यामुळे क्रांतीनगर, कुर्ला येथील सखल भागातील सुमारे ३५० नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या नागरिकांना मगनदास मथुराम मनपा शाळेत आश्रय दिला असून, त्यांच्या खानपानाची व्यवस्था केली आहे. पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सतर्कता बाळगण्यात येत आहे.

राज्यातील इतर भागांवरही परिणाम

मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई आणि पनवेल येथेही पावसाने हाहाकार माजवला आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण झाली असून, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला असून, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

पुढील सूचना येण्याची प्रतीक्षा

रेल्वे प्रशासनाने पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर आणि ट्रॅकवरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्यावर सेवा पूर्ववत करण्याबाबत सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत प्रवाशांना स्थानकांवरच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालिकाही सखल भागांमध्ये सतर्क असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिठीने धोक्याची पातळी ओलांडली

मिठी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून मिठी नदी कोपली तर मुंबईची दाणादाण उडण्याची शक्यता आहे. याचा प्रत्यय मुंबईकरांनी 26 जुलै 2005 च्या पावसात घेतला होता. आता 20 वर्षानंतर मुंबईकरांवर तशीच वेळ येते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी वाढत आहे. नदी दुथडी भरुन वाहत आहे. सध्या पाणी पातळी 4,7 मीटरपर्यंत आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी आज दिवसभर रेड अलर्ट जारी केला आहे. प्रशासन हाय अलर्टवर आहे. मिठी नदी परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची उपाय योजनाही सुरु आहे. इतर भागातील नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पहाणी :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मिठी नदी परिसरालगतच्या भागाची पाहणी केली. पवई फिल्टर पाडा येथील फुले नगर येथील जवळपास 300 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी एनडीआरएफ तैनात असल्याचे शिंदे म्हणाले.शाळा, महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली आहे. शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांनाही मुंबई महापालिकेने सुटी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

सावित्री, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेट्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. रोहा तहसीलदार व नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले असून फक्त अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, महाडमधील सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली असून, सध्या पाणी पातळी 6.30 मीटरवर पोहोचली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महाडमधील भोई घाट आणि मच्छी मार्केट परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी  : अजित पवार

राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरून जाऊ नये.सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी ,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्या. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड रत्नागिरी ,पालघर या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावरील भागावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दर तीन तासाला पावसाबाबत अहवाल सादर केला जात आहे. पावसामुळे जे बाधित लोक आहेत त्यांना सहकार्य  करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री  पवार यांनी सांगितले.

मोनोरेल बंद पडली, तब्बल ३०० प्रवाशांना बाहेर काढले


मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील रेल्वेसह मोनोरेललाही बसला आहे. मुंबईमधील चेंबूर भक्ती पार्क मार्ग या दरम्यानची मोनोरेल अचानक मध्येच बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. मोनोरेलमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. जवळपास एका तासांपासून अनेक प्रवासी बंद पडलेल्या मोनोरेलमध्ये अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी तात्काळ स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. तसेच मदतीसाठी क्रेनच्या मदतीने तब्बल दोन तासांनी ३०० प्रवाशांना मोनोरेलमधून बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर येण्यासाठी दरवाजा बंद असल्यामुळे अडचणी येत होत्या. त्यानंतर प्रवाशांनी बाहेर येण्यासाठी काच फोडली. तसेच तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवानांनी मदतीसाठी पोहोचले असून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे. तसेच एक दरवाजा उघडला असून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर येत आहे.

घटनास्थळी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासह वैद्यकीय पथक देखील दाखल झालेलं आहे. तसेच जवळच्या महानगरपालिका रुग्णालयालाही सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून तांत्रिक बिघाडामुळे ही मोनोरेल बंद पडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. जवळपास एका तासांपेक्षा जास्त वेळापासून हे प्रवाशी मोनोरेलमध्ये अडकले होते. मात्र, ही मोनोरेल अचानक कशी बंद पडली? याची चौकशी प्रशासनाकड़ून करण्यात येणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.


नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : मुख्यमंत्री

राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. जीवितहानी, पशूधन आणि घरांचे नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी अधिकारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.शेतीच्या नुकसानीचेही तातडीने पंचनामे करावेत आणि एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री  फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मंत्रिमंडळ बैठकीतही राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री   फडणवीस यांनी दिली. राज्यातील सुमारे १२ ते १४ लाख एकरवरील पिकांना फटका बसल्याची माहिती प्रथमदर्शनी हाती आल्याचेही   फडणवीस यांनी सांगितले. अजूनही पावसाचा जोर ओसरला नाही. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेचे आणि समन्वयाचे निर्देश देण्यात आले आहेत. वेध शाळांकडून मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने राज्यातील नागरिकांना पावसाबाबत दर तीन तासांनी सतर्कतेचे (अलर्ट) देण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्यातील सर्व आपत्ती नियंत्रण कक्षांना दक्ष राहण्याचे आणि माहितीचे अदान-प्रदानाबाबत समनव्य राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट