महा वॉकेथॉनमधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी
- by
- Aug 22, 2026
‘माती जपा, पाणी वाचवा’चा संदेश; राज्यभरात तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग
मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कार्याचा आदर्श घेऊन त्यांची जयंती २५ ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. ‘माती जपा, पाणी वाचवा’ हा संदेश देत जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी या उपक्रमातून एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
वस्ती येथील सागर पीईटी मैदानावर आयोजित राज्यस्तरीय ‘महा वॉकेथॉन’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा’ या संदेशातून राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आयोजित या उपक्रमात तीन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर केवळ मंत्रालयातील बैठका किंवा सभागृहातील कार्यक्रम न घेता नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. माती आणि पाणी हे राज्याच्या भवितव्याशी निगडित विषय आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी जलसंधारणाच्या चळवळीत सहभागी होऊन ती अधिक व्यापक करावी, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी दूरदृष्टीने मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला त्यांनी व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले. भविष्यातील महाराष्ट्रासाठी माती आणि पाण्याचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मंत्री राठोड यांनी अधोरेखित केले.
‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम : सचिन अहिर
माती वाचवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवा ही संकल्पना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. पाणी ही प्रत्येकाची गरज असून, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविणे आवश्यक आहे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग आवश्यक : इंद्रनील नाईक
जलसंधारण दिनानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन’सारखे उपक्रम कौतुकास्पद आहेत. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते आणि मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.
भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. स्व. सुधाकरराव नाईक यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.