रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील दर्जेदार कामाचे वाजले तीन तेरा
- by
- Jul 07, 2026
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा एक मोठा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसला आहे. नेहमी प्रवाशांची प्रचंड वर्दळ असणाऱ्या या स्थानकातील छताचा तब्बल ५० ते ६० फुटांचा मोठा भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.
घटना घडली तेव्हा परिसरात जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू होते. स्थानकातील रिक्षा स्टँड परिसरावरील छताचा भाग अचानक कोसळल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. छत कोसळत असल्याचे लक्षात येताच तेथे आसरा घेतलेल्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
विशेष म्हणजे या स्थानकाचे काही दिवसांपूर्वीच अतिशय देखणे सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात हे छत कोसळल्याने रेल्वे प्रशासनाचा आणि कंत्राटदाराचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील सर्वात महत्त्वाचे आणि २४ तास गजबजलेले स्थानक मानले जाते. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक स्थानकाच्या मुख्य छताचा मोठा भाग ५० ते ६० फूट खाली कोसळला.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, छत कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच परिसर सुरक्षित करून आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
The Global Times